पुणे - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व शेकरू आऊटडोअर्सच्यावतीने माळशेज घाट येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव पर्यावरणपूरक करण्यात आला आहे. परिसरामधील पशु, पक्षी यांना कोणतीही हानी अथवा इजा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी व दक्षता घेण्यात आली आहे. पतंग महोत्सवामध्ये बिन मांज्याचे पतंग, ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
निसर्गाचे देखणे रूप म्हणून माळशेज परिसराकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रथमच पतंग महोत्सव माळशेजमध्ये भरवण्यात आला आहे. राज्यभरातील पर्यटकांनी आपले तिकीट बुक केले आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच याठिकाणी मोठी गर्दी आहे. पर्यावरणपूरक महोत्सवामुळे सर्व पर्यटक आकर्षित होत आहेत, तर शाळकरी मुलांसोबत मोठी माणसेही या पतंग महोत्सवाचा आनंद घेत आहेत. पुढील ३ दिवस या निसर्गरम्य परिसरात हा महोत्सव सुरू राहणार आहे.
आदिवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला या विविध कार्यक्रम तसेच पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून बनवलेल्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद पर्यटक घेत आहेत. पतंग महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील पहिल्या पर्यटन तालुका असलेल्या जुन्नरच्या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना आकर्षित करून त्याठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे.