पिंपरी-चिंचवड (पुणे) - भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंमत असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हापूरला जाताना अडवून दाखवावे, असे आव्हान सोमैय्या यांनी दिले आहे. ते तळेगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
भाजप नेते किरीट सोमैय्या म्हणाले की, पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या विनंतीला मान देऊन पारनेरला जात आहे. 22 हजार शेतकऱ्यांची लूट करण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्यात स्वप्न पाहिले होते. मात्र, काही व्यक्तींनी कारखाना गिळंकृत केला आहे. त्या शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मी पारनेरला निघालो आहे. कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
हेही वाचा-धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य
28 सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार
पुढे किरीट सोमैय्या म्हणाले, की 26 सप्टेंबरला (रविवारी) अलिबागला जाणार आहे. 28 सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहे. हे ठाकरे सरकारला कळविले आहे. आता पाहुया, ठाकरे सरकार पुन्हा एकदा घोटाळेबाज हसन मुश्रीफ यांना वाचवण्यासाठी मला पुन्हा एकदा थांबविण्याचा प्रयत्न करते का? नियमांचे पालन करून दर्शन घ्यायचे आहे. अंबाबाईला प्रार्थना करतो की, ठाकरे सरकारला सदबुद्धी दे, असा खोचक टोलाही सोमैय्या यांनी लगावला आहे.
हेही वाचा-...म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
संजय राऊत यांची 55 लाख किंमत-
पुढे ते म्हणाले की, संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे... यांनी भारत जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचे सव्वा रुपया मूल्यांकन केले. भाजप प्रदेशाध्यक्षांची किंमत ही सव्वा रुपये आहे. त्यामुळे मी मानहाणीचा दावा सव्वा रुपये करणार असल्याचे अहंकारी संजय राऊत सांगतात. संजय राऊत यांची व्हॅल्यू (किंमत) 55 लाखांची आहे. त्यांनी 55 लाख पीएमसी बँकेचे चोरले होते. तुम्ही काय आमचे मूल्यांकन करणार असा टोलादेखील सोमैय्या यांनी लगाविला आहे.
हेही वाचा-सुधारित अध्यादेश राज्य सरकार निवडणूक आयोगासमोर ठेवेल-छगन भुजबळ
दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश मागे
जिल्हा दंडाधिकारी तथा राहुल रेखावार यांनी माजी खासदार डॉ. किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांच्या संभाव्य कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावेळी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व राहण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले होते. 19 सप्टेंबर 2021 रोजी पारित केलेला हा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबरला मागे घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमैया यांनी केला होता. तसेच मुश्रीफ यांचा मनी लाँडरिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचाही दावा सोमैय्या यांनी केला होता.