खेड (पुणे) - खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांना अटक करण्यात आली आहे. खेड पंचायत समितीच्या 11 सदस्यांनी एकत्र येत सभापती भगवान पोखरकर यांच्याविरूध्द अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर डोणजे येथील रिसॉर्टमध्ये घुसून शिवसेनेच्या खेड पंचायत समिती सदस्य व त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपही भगवान पोखरकर यांच्यावर करण्यात आला. याप्रकरणी भगवान पोखरकर व त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्याचे पती केशव अरगडे यांना अटक करण्यात आली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोखरकर यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यावर हल्ला करून गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अनेक गुन्हे दाखल
प्रसाद काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे यांच्यासह 15 ते 20 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगून गोळीबार करणे, विनयभंग, अपहरण, हॉटेलमध्ये जबरदस्तीने घुसून तोडफोड करणे असे गुन्हे हवेली पोलीस ठाण्यात दाखल केलेले आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरीक्त पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, हवेली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून समांतर तपास सुरू होता. दरम्यान, सभापती भगवान पोखरकर व केशव अरगडे हे दोघेही पुण्यातील शिवाजीनगर येथील मंगला टॉकीज जवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सापळा रचून अटक
त्यानंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड, गुरू जाधव, अमोल शेडगे यांच्या पथकाने मंगला टॉकीज जवळ सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'आई-बाबा बाय..' अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या