पुणे - लहान मुलांच्या संगोपनात आईप्रमाणेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्या संस्कारातुनच चिमुकल्या मुलांच्या आयुष्याच्या जडणघडणीला सुरुवात होत असते. ग्रामीण व डोंगराळ भागात अनेक समस्या असताना देखील अंगणवाडी सेविका अविरतपणे काम करत असतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा महिला बालकल्याण विभाग यांच्या वतीने सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये ४१ महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरवित करण्यात आले.
खेड तालुक्यांमध्ये २ प्रकल्प कार्यालयातंर्गत ४५२ अंगणवाड्यातुन चिमुकल्या मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करत आहेत. मात्र, यांच्या या कार्याची दखल कुणी घेत नाही. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच खेड पंचायत समितीच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील ४१ महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गावागावात अंगणवाडीमध्ये काम करत असताना सेविका व मदतनीस यांना विविध समस्याचा सामना करावा लागतो. तरीही मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम या महिला अगदी प्रामाणिकपणे करत असतात. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस अनेक वेळा आंदोलन करतात. मात्र, या आंदोलनातून त्यांच्या हाताला मात्र काहीच लागत नाही. मुलांच्या जडणघडणीत आमचा मोलाचा वाटा आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, असे अंगणवाडी सेविका अभिमानाने सांगतात.
चिमुकल्या मुलांचा आईप्रमाणे संगोपन करून त्यांच्या पुढील भवितव्यासाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव होणे हे खरेतर कौतुकास्पद आहे, असे शरद बुटे पाटील जिल्हा परिषद सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले.