पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहे. पोटनिवडणुकीत मतदानाच्या मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आघाडीवर होते.आणि सर्वच 20 च्या 20 फेऱ्यांमध्ये धंगेकर हे पुढे होते. अखेर या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. रविंद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहे.
भाजपसाठी मोठा धक्का : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत. यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. आत्ता या पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून धंगेकर हे विजयी झाले आहे. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
![Kasba Bypoll Result](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17887497_pune-election.jpg)
अनेक आरोप प्रत्यारोप : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राज्यातील सर्वच आजी-माजी मंत्री यांच्या सभा रॅली तसेच कोपरा मीटिंग घेण्यात आले होते. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटचे मतदान होईपर्यंत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत होते. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर सातत्याने कसबा पोट निवडणुकीत वेगवेगळे घटना पाहायला मिळाल्या. सूरवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी बाबत झालेले नाराजी नाट्य, त्यानंतर महा विकास आघाडीमध्ये झालेले बंड हे देखील कसबा पोटनिडणुकीत बघायला मिळाले.
![Kasba Bypoll Result](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pune-mahavikascelebrationfollwers-avb_02032023125623_0203f_1677741983_1023.jpg)
राज्यातील सर्वच नेते मंडळी कसब्यात : कसबा पोटनिवडणुकीत सुरवातीपासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक खासदार गिरीश बापट तसेच सर्वच नेतेमंडळी प्रचारात पहायला मिळाले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचा प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. या सर्व नेते मंडळींकडून प्रचारात कसबा मतदार संघातील स्थानिक मुद्दे कमी, तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच राज्य आणि देशातील मुद्दे प्रमुखाने मांडण्यात आले.
![Kasba Bypoll Result](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-04-kasba-potnivadnuk-nikal-avb-7210735_02032023124153_0203f_1677741113_60.jpg)
खासदार गिरीश बापट यांचे महत्त्व : कसबा मतदारसंघ म्हटले की, खासदार गिरीश बापट यांचे नाव आले. कारण गेल्या पाच वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट यांना कसब्यातील किंगमेकर असे म्हटल जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट हे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अशातच आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत बापट प्रचाराला येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी असतील, तसेच विरोधी पक्षातील नेते मंडळी असतील या सर्वच नेत्यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार दिलीप पाटील यांची भेट घेतली. दुसऱ्याच दिवशी बापट प्रचाराला आले. बापट हे जरी हेमंत रासने यांच्या प्रचाराला आले असले, तरी विरोधकांकडून भाजपवर जोरदार टिका करण्यात आली होती.
![Kasba Bypoll Result](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pune-congressbhavenfoolwers-avb-mh_02032023135836_0203f_1677745716_486.jpg)
काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर : मतमोजणीच्या एकही फेरीमध्ये रासने यांना धंगेकरांच्या पुढे जाता आले नाही. विशेष म्हणजे कसबा मतदारसंघातील जो भाग भाजपचाच असल्याचे सांगितले जात होते, त्या भागातही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणूकीत सुरूवातीला भाजपकडून टिळक कुटुंबीयातूनच उमेदवारी जाहीर केली जाईल, असे वाटत होते. मात्र भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने येथील बहुसंख्य असलेला ब्राम्हण समाज नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्याचीच प्रचिती या निकालांमधून दिसून आली आहे.
मतदारांनी भाजपला पूर्णपणे नाकारले : विशेष म्हणजे रासने यांच्या प्रचारासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, भाजप - शिंदे गटाचे आमदार, खासदार, केंद्रातील मंत्र्यांनी हजेरी लावली होती. मात्र तरीही हा पराभव झाल्याने मतदारांनी भाजपला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचारामध्ये पूर्ण ताकद लावली होती. काँग्रेसच्या नेत्यांसह, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही सभा तसेच रोड शो घेऊन धंगेकर यांचा प्रचार केला होता.
दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला होता विजयाचा विश्वास : महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तर मी 15 हजार मताधिक्याने विजयी होणार असल्याचे सांगितले होते. महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी मी 25 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. परंतु विजय मात्र धंगेकर यांचाच झाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत पहायला मिळाली आहे.