पुणे - लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. सरकारी कार्यालय, खानावळी, हॉटेल सर्व काही बंद आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिथे नागरिकांचीच खाण्याची गैरसोय झालीय. तिथे भटक्या कुत्र्यांचा विचार न केलेलाच बरा, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र, पुण्यातील 'कर्मा फाउंडेशनने' अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांच्या अन्नासाठी पुढाकार घेतला आहे. या फाउंडेशनंने आतापर्यंत शहरातल्या 8 हजारपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांना अन्न दिले आहे.
यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते माहिती घेतात आणि जिथे भटके कुत्रे आहेत तिथं जाऊन त्यांना खाऊ घालतात. दोन चारचाकी गाड्यांतून शहरासह उपनगरातही कुत्र्यांसाठी अन्न घेऊन जातात. पूर्वी हॉटेल सुरू असताना या कुत्र्यांना उरलेलं अन्नधान्य खायला मिळत होतं. मात्र, आता ती परिस्थिती राहिली नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी कर्मा फाउंडेशन पुढाकार घेतलाय.