पुणे - कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. उपचारासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नाहीत. औषधांचा तुटवडा आहे, तर रुग्णाची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकादेखील वेळेवर मिळत नाही. वेळेवर रुग्णावाहिका न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. आरोग्य व्यवस्थेवरील हा पडणारा ताण कमी करण्यासाठी पुण्यातील काही रिक्षाचालकांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या रिक्षात काही मूलभूत सुविधा तयार करून त्यांनी रिक्षाचे रूपांतर तात्पुरत्या रुग्णवाहिकेत केले आहे.
यांची आहे संकल्पना -
पुण्यातील 'बघतोय रिक्षावाला फोरम' ही रिक्षाचालकांची संघटना आहे. शंभराहून अधिक रिक्षाचालक या संघटनेचे सदस्य आहेत. परंतु भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर यातील अनेक रिक्षा बंद होत्या. ज्यांचा उदरनिर्वाह केवळ रिक्षावर अवलंबून होता. असे रिक्षाचालक यामुळे संकटात आले. अशावेळी या संघटनेचे प्रमुख असलेले डॉ. केशव क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन रिक्षातून कोरोनाबाधित रुग्णांची ने-आण कशी करता येईल, याची माहिती घेतली. या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना डॉ. किशोर क्षीरसागर म्हणाले, मागील अनेक वर्षापासून ते वैद्यकीय व्यवसायात आहे. त्यांनी अनेक रुग्णांना रिक्षातून रुग्णालयात येताना पाहिले आहेत. सध्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. रुग्णवाहितका न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशावेळी रिक्षात आपण ऑक्सिजन कीट फिट करून तिचे रूपांतर तात्पुरत्या रुग्णावाकेत करू शकतो, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्यातून ही 'जुगाड ॲम्बुलन्स' अस्तित्वात आली.
'जुगाड ॲम्बुलन्स'चे शुल्क कमी -
लॉकडाऊन लागल्यापासून अनेक रिक्षा बंद आहेत. रिक्षाचालकांची उत्पन्न यामुळे बुडत आहे. रुग्णसेवेसाठी अशाप्रकारे रिक्षा रुग्णावाहिकेचा वापर केला, तर या रिक्षा चालकांनाही काही प्रमाणात रोजगार मिळेल आणि सध्याची गरजही भागली जाईल. सद्या रुग्णवाहिकेने जवळच्या अंतरावर जाण्यासाठी अंदाजे पाच ते दहा हजार रुपये इतके शुल्क आकारले जाते. तर या 'जुगाड ॲम्बुलन्स'च्या माध्यमातून हे शुल्क केवळ 300 ते 500 रुपये इतकेच आकारले जाते.
15 मिनिटात पोहोचते रिक्षा -
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या 'जुगाड ऍम्ब्युलन्स'ची माहिती पोहोचवण्यासाठी या रिक्षाचालकांनी एक हेल्पलाइन तयार केली आहे. हेल्पलाइन 24 तास सुरू असते. रिक्षाचालक स्वतः या हेल्पलाईनवर काम करत असतात. एखाद्या रुग्णाचा फोन आल्यानंतर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्या-त्या परिसरातील रिक्षाचालकांपर्यंत ही माहिती पोचवली जाते. त्यानंतर 15 मिनिटात रिक्षा संबंधित रुग्णाच्या घरापर्यंत पोचवली जाते.
मदतीला डॉक्टरांची एक टीम -
रुग्णाच्या सद्यस्थितीतील गरजेनुसार 'जुगाड ॲम्बुलन्स' त्याच्याकडे पाठवली जाते. ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्या रोखण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध असलेली रिक्षा पाठवली जाते. स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संबंधित रुग्णासाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली जाते. त्याशिवाय डॉक्टरांची एक टीमही या जुगाड ॲम्बुलन्स सोबत जोडलेली आहे. संबंधित रिक्षाचालक या डॉक्टरांना फोन करून पेशंटची सद्यस्थिती सांगतात आणि त्यानुसार संबंधित रुग्णाला ऑक्सिजन केला जातो. त्यानंतरच ही रिक्षा रुग्णालयाच्या दिशेने पुढे जाते.
हेही वाचा - 'मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच, माहिती न घेता भाजपची भ्रष्टाचाराची बोंब'