पुणे Jitendra Awhad : शरद पवारांच्या जवळचे राष्ट्रवादीतील दोन मोठे नेते म्हणजे अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड. मात्र या दोघांमधून आता विस्तवही जात नाही. अजित पवारांच्या बंडानंतर त्यांच्यातील अंतर आणखी वाढलं. आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना उद्देशून एक मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं चित्र आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. "कार्यकर्त्यांमध्ये कुठेही संभ्रम नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच निवडणुकीला सामोरं जाऊ", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं. "आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कुणालाही पक्षात घेणार नाही. तसेच उपमुख्यमंत्रीही करणार नाही", असं ते म्हणाले. "२०१९ मध्ये अजित पवार राष्ट्रवादीत परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं हे चूक होतं", असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
अजित पवारांचा धमकी देण्याचा स्वभाव : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट दिलेल्या आव्हानावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अजित पवारांचा धमकी देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनच आहे. आता ते उघड धमक्या देत आहेत. पक्षात देखील आजपर्यंत त्यांनी तेच केलं. शरद पवारांच्या जवळची चांगली माणसं त्यांनी तोडली. ही अजित पवारांची दादागिरी आहे. त्यांनी वर्षानुवर्ष पक्षात दादागिरी केली", अशी जळजळीत टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.
जयंत पाटील पक्ष सोडून जाणार का : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चेवरही जितेंद्र आव्हाडांनी आपली बाजू मांडली. "मी शंभर टक्के ठाम आहे की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत. ते कुठेही जाण्याचा चान्स नाही", असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
हे वाचलंत का :