पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटीलांनी केलेल्या टिकेला उत्तर दिले आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे, हे चंद्रकांत पाटील यांनाही माहित आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी हे सरकार दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही, असे सांगितले होते. परंतु आता सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. उरलेली चार वर्षे हे सरकार पूर्ण करेल. हे सरकार टिकणार नाही, असे म्हणण्यातच चंद्रकांत पाटलांची चार वर्षे जातील, असा टोला पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना हाणला.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांचा काल (गुरूवार) उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अरुण लाड चांगल्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
काय म्हटले होते चंद्रकांत पाटील?
तसेच भाजपातर्फे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी बुधवारी अर्ज भरला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे सरकार जास्तकाळ टिकणार नाही असे म्हटले होते.
अरुण लाड चांगल्या मतांनी विजयी होतील-
जयंत पाटील म्हणाले, अरुण लाड यांनी मागील सहा वर्षापासून अतिशय समर्थपणे पक्षाचे काम केले आहे. मागील सहा वर्षाच्या काळात त्यांनी लोकसभा असो किंवा विधानसभा असो पक्षाचा इतरही कामात पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील एक सहकारी कारखाना त्यांनी अत्यंत उत्तमपणे चालवला आहे. ते स्वच्छ आणि उत्तम चारित्र्याचे उमेदवार आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसह इतर मित्र पक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ते चांगल्या मतांनी विजयी होतील.
हेही वाचा- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वीच युद्धपातळीवर तयारी; सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले 'हे' आदेश