पुणे Jayant Patil on EC : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून येत्या 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. याबाबत आम्ही आमची बाजू मांडणार असून निवडणूक आयोगाला हा डिस्प्यूट नसल्याचं सांगितलं होतं. यासाठी त्यांनी आमची बाजू ऐकावी. परंतु, निवडणूक आयोगानं आमची बाजू एकूण न घेता फूट पडल्याचं जाहीर केलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय. याबाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेत असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील बोलत होते.
अजित पवारांना दुसरे काम असेल : अजित पवार का आले नाही, हे मला माहीत नाही. ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना दुसरे काही काम असेल यामुळे बहुतेक ते आले नसतील असं जयंत पाटील म्हणाले. तसंच राज्य सरकारनं खासगीकरणाचे जीआर काढला. यावर पाटील म्हणाले की, हजारो मुलं परीक्षा देऊन तयारी करीत असतात. पण आता कंत्राटी पद्धत आणली आहे. कंत्राटीपेक्षा सरकारी नोकऱ्या कमी होऊ नयेत. कुठल्या आमदार खासदाराची ही कंपनी असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडू. हे खूप धक्कादायक असून आम्ही याचा विरोध करतो असं यावेळी पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या कुठं-कुठं सभा : शिवसेना नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेतील. त्यानंतर काही सभा एकत्र होतील तर काही स्वतंत्रपणे होतील. तसंच ठाण्यात वज्रमूठ सभा होईल असा अंदाज असल्याचं पाटील म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्यात अद्यापपर्यंत कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. पाऊस न झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काळात पाण्याचं संकट निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी धरणात पाणी कमी झालंय. सरकारनं सुयोग्य व्यवस्था न केल्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचं संकट येणार आहे. उद्या मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक पंचतारांकित हॉटेलमध्ये होत असली तरी तिथं दुष्काळाबाबत चर्चा झाली पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा :