राजगुरुनगर (पुणे) - 'धरणात जमीन गेली, चक्रीवादळात घरे गेली, अन्नधान्य पावसात भिजले, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला कोणतेही काम नाही आणि सरकार तीस वर्षांपासुन आमचे पुनर्वसन करण्यापासुन पळ काढत आहे. आम्ही जगायचे तरी कसे?' असे सांगत भामा-आसखेड धरणग्रस्तांनी पोलिसांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
'सरकार पुण्याला पाणी देण्यासाठी घाई करत आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. आमच्याच जमिनीवर धरण बांधून आमच्याच शेतीला पाणी नाही.' अशी तक्रार करत मागील 24 तासांपासुन भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आपल्या संपुर्ण कुटुबांसह धरण जलाशयात बसुन आहे. मात्र, तरिही जलवाहिनीचे काम बंद केले जात नसल्याने धरणग्रस्तांचा संताप अधिकच वाढत आहे.
हेही वाचा... निसर्ग चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर; किहीम आदिवासी पाडा मदतीच्या प्रतिक्षेत
मागील तीस वर्षांपासुन हक्काच्या पुनर्वसनासाठी भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या तीन पिढ्यांनी लढा दिला आहे. पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सरकार पुनर्वसन करण्याची मानसिकता दाखवत नसल्याचे येथील बाधितांनी म्हटले आहे. त्यामुळे भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आता कुटुंबासह जलसमाधी घेण्याच्या पवित्र्यात उभे आहे. यासाठी मागील 24 तासांपासुन ते सर्वजण जलाशयात बसुन आहेत. जलाशयाच्या सर्वच बाजुने पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.