नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानासाठी 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात आपल्या मतदारसंघात सभा घेतली. शहरातील कानाकोपऱ्यात त्यांची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. दरम्यान, या सर्व मुद्द्यांवर 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
सर्वाधिक जागा भाजपा जिंकेल : महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो, असं म्हंटलं जातं. त्यामुळं भाजपासह काँग्रेसनं विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. "संपूर्ण विदर्भामध्ये भाजपानं अतिशय सुक्ष्म नियोजन केलं आहे. विदर्भात भाजपा सर्वाधिक जागा जिंकेल," असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केवळ विदर्भचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपासाठी फार अनुकूल वातावरण असल्याचं ते म्हणाले.
नागपुरात फडणवीसांचा दबदबा : देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात मोठा प्रभाव आहे. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द नागपूरशी जोडलेली आहे. येथून ते सर्वात तरुण महापौर बनले. त्यानंतर ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सातत्यानं निवडणूक जिंकत आहेत. त्यामुळं त्यांचा मोठा चाहतावर्ग नागपूरमध्ये आहे.
मुंबईत घर नाही : "मी आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत. महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचं मुंबईत स्वतःचं घर देखील नाही. आजही माझे घर नागपूरमध्येच आहे," असं म्हणत नागपूर दक्षिण पश्चिम या स्वतःच्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना भावनिक साद घातली.
हेही वाचा -