पुणे - देवा चांगला पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, सर्वांना सुखी समाधानी ठेव हेच मागणं मागण्यासाठी लाखो वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. राज्यातल्या विविध जिल्ह्यातून वारकरी देहूत आले होते. आज ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थाने झाले. यावर्षी या सोहळ्यात 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत.
आज सकाळपासूनच प्रस्थान सोहळ्याच्या विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. पहाटेची काकड आरती करून या प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झाली. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी संत तुकारामांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी तसेच वारीमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारीच देहूनगरी मध्ये दाखल झाले होते.
सोमवारी सकाळपासूनच मुख्य मंदिराच्या बाहेर भाविकांच्या रांगा दिसून येत होत्या. तसेच इंद्रायणीचा काठ देखील वारकरी आणि भाविकांनी फुलून गेला होता. दरवर्षी नित्यनेमाने वारी आली म्हणजे वारकऱ्यांचे पाऊल देहूकडे वळत असतात. यावर्षीही राज्यातून तसेच बाहेरील राज्यातून भाविक या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देहूनगरीत दाखल झाले होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत.