पुणे - आमच्यावर जबाबदारीचा असलेला भार, तुमच्यासारख्या नव्या पिढीकडे सोपवण्यासाठी तुम्ही अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्रात आले पाहिजे, असे आवाहन इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी विद्यार्थ्यांना केले. पुण्यातील मुक्तांगण शाळेच्या संशोधिकेला के. शिवन यांनी शुक्रवारी भेट दिली, यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हेही वाचा - 'नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा'
यावेळी ते शिवन म्हणाले, इस्रो नवनवीन प्रकल्पावर काम करत आहे. अंतराळात उपग्रह पोहोचवण्यासाठी उच्च दर्जाच्या रॉकेट तयार करण्याचे आव्हान आहे, तेही कमी खर्चात. त्यामुळे आम्ही देशी तंत्रज्ञान विकासावर भर दिला असल्याचे वक्तव्य शिवन यांनी केले आहे.
चांद्रयान - 2 मोहिमेची तयारी सुरू आहे. पहिल्या मोहिमेत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, ही मोहीम चांद्रयान - 1 सारखीच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच गगन यान मोहीमेबाबत ही त्यांनी माहिती दिली. गगनयान मोहिमेव्दारे मानव अंतराळात पाठवण्याचे आव्हानात्मक काम करण्यासाठी कमी खर्चिक देशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पहिल्या 2 टप्प्यात मानवविरहित तर तिसऱ्या टप्प्यात मानवाला अंतराळात पाठवण्याचा प्रयत्न आहे, असे शिवन यांनी सांगितले. तर तंत्रज्ञानासाठी आपण रशिया अमेरिका या देशांवर अवलंबून राहण्याऐवजी इतर देशांनी आपल्या कडून काही शिकले पाहिजे, हे माझे ध्येय आहे, असे के. शिवन यांनी सांगितले.
हेही वाचा - 'सुटाबुटातल्या सरकारमुळे देशाची अवस्था अतिदक्षता विभागातल्या रुग्णासारखी'