आळंदी (पुणे) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 724 वा संजीवन समाधी सोहळा अलंकापुरीमध्ये मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडत आहे. सहा दिवस चालणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचे संकट असल्याने आळंदी बाहेरुन येणाऱ्या भाविकांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका आळंदीतील वाद्यनिर्मिती करणाऱ्या विक्रेत्यांना बसला असून यंदा वाद्यांच्या खरेदी-विक्रीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबणार असल्याने वाद्यनिर्मिती विक्रेत्यांवर मोठा आर्थिक संकट आले आहे, अशी भावना विजय वाडेकर यांनी व्यक्त केली आहे.
आळंदीत घुमणार नाही ब्रह्मनाद
यंदाच्या वर्षी आषाढी व कार्तिकीवारी सोहळा होत असताना कोरोनामुळे आळंदीमध्ये हरिनामाचा गजर होत असताना टाळ-मृदंग, तबल्याचा ब्रह्मनाद यंदा घुमलाच नाही. आषाढी व कार्तिकी वारी निमित्ताने शेकडो भाविक वारकरी आळंदीत येऊन आपल्या भजनी मंडळासाठी आणि दिंडीसाठी टाळ-मृदंग, तबला, पाख्वाद खरेदी करत असतात. मात्र, यंदाच्या संचारबंदीमुळे वाद्यांची खरेदी-विक्री होणार नाही. त्यामुळे तयार केलेली वाद्य दुकानातच धूळखात पडून असून यामुळे वाद्य उत्पादकांचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना वाद्य विक्रेते व्यक्त करत आहेत.
वाद्य उत्पादकांना द्या मदतीचा हात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे कार्तिकीवारी सोहळा होत असताना आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आळंदीत येणारा भाविक वारकरी घरी थांबला आहे. त्यामुळे यंदा वाद्याची खरेदी-विक्री थांबली असून वाद्य उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मायबाप सरकारने वाद्य उत्पादकांना मदतीचा हात देण्याची मागणी वाद्य उत्पादक विजय वाडेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - हिंजवडीमध्ये पकडला 30 लाखांचा गुटखा; मुख्य आरोपी फरार
हेही वाचा - संजीवन समाधी सोहळ्याला गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरुवात..