पिंपरी -चिंचवड ( पुणे ) : ऊसापासून रस बनवल्याच अनेकांनी पाहिलं असेल. त्याचा आस्वाद देखील घेतला असेल. पण, कधी ऊसापासून कच्चा गूळ अन् त्यापासूनच चहा अशी झटपट प्रक्रिया पाहिली आहे का? नाही ना. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ग्राहकांच्या समोरच ऊसापासून रस अन् त्यापासून काकवी ( Raw Jaggery Making Machine ) बनवत थेट चहा तयार केला ( Healthy Tea From Raw Jaggery ) जातोय. तो ही अवघ्या काही मिनिटांमध्ये. 'गारवा' असं या मशीनच नाव असून, अवघ्या काही मिनिटांत ऊसाच्या रसापासून काकवी तयार करून त्यापासून आरोग्यदायी चहा बनवला जातोय. ही प्रक्रिया भारतात नव्हे तर, जगात पहिल्यांदाच होतेय असा दावा 'गोडवा'चे मालक निरंजन शेंडगे यांनी केलाय.
आयटी अभियंत्यांची कमाल
पिंपरी-चिंचवडमध्ये काही आयटी अभियंत्यांनी एकत्र येत 'गारवा' नावाचं मशीन बनवलं आहे. त्याद्वारे ऊसापासून रस आणि त्यापासून काकवी अशी झटपट प्रक्रिया करून कच्चा गुळ तयार केला जातो. त्याच गुळाचा वापर चहा बनवण्यासाठी केला जात असून, तो रसायनमुक्त आहे असं शेंडगे यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवडकरांच्या पसंतीला हा चहा उतरत असून, गर्दी होत आहे. ज्यांना चहा प्यायचा आहे त्यांनी चहाचा आस्वाद घ्यायचा. नाहीतर ऊसाचा रस देखील त्याठिकाणी उपलब्ध आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होत असून, त्यांच्याकडून ठोक दराने ऊसाची मोळी विकत घेतली जाते असल्याचं शेंडगे यांनी सांगितलं.
नेमकी प्रक्रिया काय आहे जाणून घेऊयात..
'गारवा' नावाच्या मशीनमध्ये ऊसाच कांडं टाकलं जातं. त्यामधून ऊसाचा रस येतो. पातेलं भरताच तो रस मशीनच्या इतर भागात म्हणजेच गरम होण्यासाठी एका खोलगट टाकीत टाकला जातो. तिथे उकळ्या फुटेपर्यंत रस ठेवला जातो, काही मिनिटांत त्याची काकवी (कच्चा गूळ) तयार होते. त्यापासून चहा बनवला जातो. गारवा ही मशीन पिंपरी-चिंचवडमधील तरुणांनी बनवली असून, यासाठी पाच लाख रुपये खर्च येतो. पण काहीही असो, गुळाच्या चहाची चव लई भारी, अशी प्रतिक्रिया ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.