पुणे - जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली. उत्तर पुणे जिल्ह्यात बटाटा, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतितात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना पिकविमा किंवा सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे, असे पाहणी दरम्यान माध्यमांशी बोलताना म्हैसेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - 'बिव्हीजी'च्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा, राष्ट्रपती भवनात पुरवते स्वच्छता सेवा
डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्यात परतीच्या पावसाने शेती व इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्याचे काम सुरू असून 2 दिवसात पंचनामे पूर्ण केले जातील. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मदत दिली जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसेल त्यांना सरकारच्या माध्यमातून मदत पुरवण्या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही म्हैसेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय
सध्या रब्बी हंगाम सुरू होत असताना खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी तत्काळ कर्जपुरवठा व अतितत्काळ मदत देण्यासाठी शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लवकरच मदत देण्याचे आश्वासन म्हैसेकर यांनी दिले.