पुणे - विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन त्यातील उकळते ऑइल एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एका चार महिन्यांच्या बाळाच्या अंगावर उडाले. यात आजीसह नातीचा मृत्यू झाला होता. या घटनेतील जखमी महिलेवर उपचार सुरू होते. तिचाही मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. 5) घडली.
काय आहे घटना -
शनिवारी दुपारी भोसरी इंद्रायणीनगर येथे रोहित्राचा स्फोट होऊन भीषण आग लागली. डीपीतील ऑइल शेजारी असलेल्या राजवाडा इमारतीवर उडाले. त्यावेळी अंगणातील मोकळ्या जागेत हर्षदा त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीला अंघोळ घालत होत्या. त्यांच्या आई शारदाही तिथेच थांबलेल्या होत्या. गरम ऑइल तिघींच्याही अंगावर पडल्याने सर्वजण गंभीररित्या भाजल्या. यात काल आजीसह नातीचा मृत्यू झाला. त्यानंतर हर्षदा हिने मंगळवारी रात्री प्राण सोडले.
शारदा कोतवाल (वय 51), शिवण्या काकडे (वय 4 महिने), हर्षदा सचिन काकडे अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दिलीप कोतवाल यांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना रोहित्र हलवण्यास सांगितले होते. मात्र, महावितरणने हलगर्जीपणा करत याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे रोहित्राचा भीषण स्फोट होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात महावितरणचे अधिकारी सुनील रोटे आणि इतर जबाबदार असलेले अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.
हेही वाचा - जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांना अटक
हेही वाचा - भोसरीमध्ये रोहित्राचा स्फोट, 4 महिन्यांच्या चिमुकलीसह आजीचा मृत्यू