पुणे - दोन दिवसांपासून मावळ परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने रौद्ररुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नदीपात्राने धोक्याची पातळी गाठली असून सोपान पूल पाण्याखाली गेला आहे.
नदी काठावरील निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, मोशी, डूडुळगाव, केळगाव, आळंदी, सोळू, चऱ्होली, धानोरे, मरकळ, गोलेगाव व इतर काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इंद्रायणी नदी परिसरात गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. नदीपात्रातील जलपर्णी वाहून नव्या पुलाजवळील जुन्या बंधाऱ्यात अडकल्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.
इंद्रायणी घाटावरील मंदिरे, अस्थिविसर्जन कुंडही पाण्याखाली गेले आहे. घाटाच्या बाहेर पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेली इंद्रायणी आता दुथडी भरुन वाहू लागल्याने नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. इंद्रायणी नदीवर असणारे पूलही पाण्याखाली गेले आहेत.