पुणे - रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे. याची सोशल मीडिया ते राजकीय स्तरापर्यंत बरीच चर्चा होत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे, विनाकारण स्टेशनवर येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण रेल्वेच्या प्रवक्त्याकडून देण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेकडून लॉकडाऊनमध्ये 1 जूननंतर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासूनच प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळातच रेल्वेने सुमारे 250 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत पाच पट वाढ केली आहे. रेल्वेने ही किंमत 10 रुपयांवरून 50 रुपये केली आहे.
हेही वाचा - पिंपरीत घरातच बनावट नोटा छापणारे जेरबंद; २ लाख ९८ हजारांच्या नोटा जप्त
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. पुणे रेल्वे स्थानकांवर साधारणतः दिवसाला 60 ते 65 प्लॅटफॉर्म तिकीट विक्री होत आहे. दिव्यांग, अंध किंवा ज्या प्रवाशांना वैद्यकीय कारणास्तव मदतनीसाची गरज आहे, त्यांना रेल्वे गाडीपर्यंत सोडण्यासाठी किंवा तेथून आणण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करून दिले जात आहे. त्या तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे.
![तिकीट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-04-railway-platformtikit-50-rupees-ap-mh10021_19082020093847_1908f_1597810127_366.jpg)
रेल्वेचा राष्ट्रीय लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर या तिकिटाची किंमत कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केले आहे. प्लॅटफॉर्म तिकीट पुणे विभागातील सर्वच स्थानकांवर उपलब्ध करून देणे बंद आहे. पुणे स्थानकावर मर्यादित प्रमाणात ते देण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - डेडलाईन हुकली, आता 'या' तारखेला सुरू होणार पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'