पुणे : पुण्यात 3 बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्यावतीने पहाटेपासून छापेमारी करण्यात येत आहे. पुण्यातील औंध येथील सिंध सोसायटीमध्ये ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हे बांधकाम व्यवसायिक राजकीय नेत्यांच्या संपर्कातील असल्याचे सांगितले जात आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आज सकाळपासूनच आयकर विभागाच्यावतीने औंध परिसरातील सिंध सोसायटीमध्ये राहणाऱ्या या 3 व्यवसायिकांवर छापेमारी करण्यात आली आहे. याआधी देखील पुण्यात अश्याच पद्धतीने विविध बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांवर छापेमारी करण्यात आली होती.
बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर : पुण्यातील बाणेर परिसरातील सिंध सोसायटी ही उच्चभू सोसायटी म्हणून ओळखली जाते. एकाच सोसायटीत राहणारे तीन बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. हे तिन्ही व्यावसायिक एकमेकांचे व्यावसायिक भागीदार आहेत. आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या निवासस्थानी पोहोचून प्रत्येक बिल्डरची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. बिल्डरांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचे समोर आले आहे.
नाशिकमध्ये तब्बल सहा दिवसांची कारवाई : नाशिकमध्ये नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठी कारवाई नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे.आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये बिल्डरांचे ३३३३ कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आले आहेत. या कारवाईचे धागेदोरे पुणे शहरातही होते. नाशिकमध्ये सहा दिवस ही कारवाई सुरू होती. बांधकाम व्यावसायिकांकडून कार्यालये, निवासस्थाने आणि इतर ठिकाणे तोडण्यात आली. आयकर अधिकाऱ्यांनी सहा दिवसांत ३,३३३ कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार उघड केल्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे. बिल्डरांचे गुंतवणूकदार रडारवर असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे करचुकवेगिरी करणाऱ्या बिल्डरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सहा दिवसांच्या तपासानंतर नेमके काय निष्पन्न झाले? त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.