पुणे - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानंतर एनआयएची टीम सोमवारी पुण्यात दाखल झाली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातून या प्रकरणी माहिती घेतली आहे. यावेळी, पोलीस महासंचालकांच्या परवानगी शिवाय या प्रकरणासंबंधातील कुठलीही कागदपत्रे देण्याबाबत पुणे पोलिसांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे एनआयएने पोलीस महासंचालकांकडे तपासाची कागदपत्र देण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे वृत्त आहे.
गेल्या आठवड्यातच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, असे करणे म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर घाला असून केंद्र सरकारकडून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचा संबंध पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेसोबत जोडला जात आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनात संशयित माओवाद्यांचा सहभाग होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. मात्र, हा संपूर्ण तपास संशयास्पद असून या तपासाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती.
हेही वाचा - ..त्यामुळेच कोरेगाव-भीमा प्रकरणात तपास एनआयएकडे देण्याचे षडयंत्र - बी.जी.कोळसे पाटील
राज्य सरकारने देखील त्या दिशेने हालचालीही सुरू केल्या होत्या. असे असताना केंद्र सरकारने या प्रकरणात हात घालत तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला. याबाबचे अधिकृत पत्र घेऊन अधिकारी पुणे पोलिसांकडे आले होते. त्यांनी पुण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चादेखील केली. आता एनआयए करत असलेल्या या तपासाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.