पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गुटखा विक्री करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून गुटखा बनवण्याची मशीन जप्त करण्यात आली असून त्याद्वारे गुटखा बनवत असल्याचे समोर आले आहे. अशा आणखी काही मशीन शहरात असण्याची शक्यता भोसरी पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - सरकारने ईडब्लूएसची घाई केली, 25 तारखेच्या सुनावणीत गडबड झाल्यास सरकार जबाबदार - संभाजीराजे
आरोपींकडून 1 लाख 65 हजारांचा गुटखा आणि 6 लाखांचे इनोव्हा वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी प्रशांत रोहीदास कुमकर (वय 29), संकेत रामचंद्र भडाळे (वय 28), श्रीधर पोपट रायकर (वय 26) आणि निखील अशोक पायगुडे (वय 28) याला अटक करण्यात आली आहे.
सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली, की कासारवाडी येथील हॉटेल किनारा जवळ इनोव्हा वाहनामध्ये प्रतिबंधित गुटखा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या बातमीची खात्री केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी यांनी किनारा हॉटेल जवळील रोडवर सापळा रचून वाहनातील चार जण ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यात 1 लाख 65 हजार किंमतीचा गुटखा आढळून आला.
मशीनद्वारे बनवायचे गुटखा
संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सर्व आरोपी कच्चा माल घेऊन मशीनद्वारे गुटखा बनवत असल्याचे चौकशीतून समोर आले. मशीन दिल्लीहून आणल्याचे आरोपींनी कबूल केले असून ते नामांकित कंपनीचा गुटखा बनवत होते. भोसरी पोलिसांनी एकूण 7 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, अप्पर सहा. पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, समीर रासकर, सुमीत देवकर आदींनी केली.
हेही वाचा - 18 दिवसांत किल्ले, शिखरं आणि घाटवाटांचा प्रवास...पुण्यातील माजी सैनिकांची मोहिम