दौंड - दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना रांगोळीतून अभिवादन करण्यात आले आहे. पांढरेवाडीमधील सामाजिक कार्यकर्ते विलास निवृत्ती येचकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले आहे. ही 4 फूट रुंद आणि 8 फूट लांब रांगोळी काढण्यासाठी त्यांना तब्बल तीन दिवसांचा कालावधी लागला.
सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला असते. हा दिवस शासनाने आता महिला शिक्षक दिवस म्हणून जाहीर केला आहे. या निमित्ताने विलास येचकर यांनी रांगोळी काढली आहे. या रांगोळीमधून त्यांनी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा साकारली आहे. या रांगोळीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
चार फूट रुंद आणि आठ फूट लांबीची रांगोळी
पांढरेवाडीचे पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विलास निवृत्ती येचकर यांनी ही रांगोळी काढली आहे. त्यांना या साठी चार ते पाच किलो रांगोळी लागली आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले, त्यांनी 31 डिसेंबर रोजी ही रांगोळी काढण्यास सुरूवात केली होती. 3 जानेवारी रोजी या रांगोळीचे काम पूर्ण झाले. या रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी सावित्रीबाई फुले यांची सुंदर अशी प्रतिमा साकारली आहे.