पुणे - दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात पुणे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पुणे सोलापूर महामार्गाच्या उड्डाण पुलाजवळ छापा टाकून मद्यसाठा जप्त केला आहे. यामध्ये विविध ब्रँडचे 20 बॉक्स आणि वाहनासह एकूण सहा लाख 21 हजार 560 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक ए.जी. बिराजदार यांनी दिली. हा बेकायदा मद्यसाठा गोव्यातून चोरीच्या मार्गाने विक्रीसाठी आणला असल्याचे उघड झाले आहे. विशाल सतीश जगताप (वय 27) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने रविवार व सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. कुरकुंभ एमआयडीसी परिसरात बेकायदा मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या भरारी पथकाने कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील मुकादम वाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपीच्या घरासमोर पांढऱ्या रंगाची चारचाकी उभी होती. या वाहनात दारूचे बॉक्स असल्याचे समोर आले.
यानंतर तपासणी दरम्यान आरोपीने राहत्या घराशेजारील जुन्या पडक्या खोलीमध्ये आणखी बेकायदेशीर मद्यसाठा असल्याचे कबूल केले.
संबंधित कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक ए. जी. बिराजदार, दुय्यम निरीक्षक विकास थोरात, एस के कानेकर यांच्यासह अन्य सहकाऱयांनी केली. पुढील तपास निरीक्षक ए.जी बिराजदार करत आहेत.