पुणे - आंबेगाव तालुक्यातील रांजणी फाटा येथे एका चारचाकी वाहनातून बेकायदा देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये एक लाख रुपये किमतीच्या अवैध दारूसह इको नामक चारचाकी ताब्यात घेण्यात आली असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यात अवैध दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंचर पोलिसांकडून रांजणी फाटा येथे इको चारचाकीत (एमएच 14 जीवाय 3736) देशी व विदेशी अशा विविध कंपन्यांची दारू आढळली. पोलिसांनी संबंधित चारचाकी ताब्यात घेतली असून, अतुल महादू ढोबळे (वय 26) या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध बाँम्बे प्रोव्हिजन अॅक्ट अंतर्गत कलम 65 ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मंचर पोलीस अधिक तपास करत आहेत.