पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे तळीरामांची गैरसोय होत आहे. छुप्या पद्धतीने मिळेल त्या दराने मद्यपी दारू घेण्यास तयार आहेत. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील वाघजाई नगर परिसरात गावठी दारूची छुप्या पद्धतीने विक्री केली आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करुनही दारू विक्रीवर कारवाई होत नसल्याने अखेर नागरिकांनीच दारुअड्डा उद्ध्वस्त केला आहे.
हेही वाचा- Global Covid-19 Tracker : जगभरात कोरोनामुळे 82 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
कोरोनाच्या पार्श्वभूमावर मद्य विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बार, वाईनशॉप, देशी दारू बंदकरुन सील करण्यात आले आहेत. मात्र, यावर उपाय शोधून गावागावांत दारुविक्रीचे अड्डे उभारण्यात आले आहेत. याचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होत असून दारू पिण्यासाठी बाहेरील गावचे नागरिक या दारू अड्ड्यावर येत आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी कारवाई करीत दारूअड्डा उद्ध्वस्त केला आहे. तर दारू विक्रेत्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.