पुणे - कोरोनावर लस कधी येणार? याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे लसीसंदर्भातील प्रत्येक बातमी महत्वाची ठरत आहे. अशीच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची 'कोविशिल्ड' लस जी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आयसीएमआर यांच्याकडून तयार केली जात आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठीची नोंदणी पूर्ण झाली आहे.
कोविशिल्ड लसीच्या क्लिनिकल ट्रायलच्या नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. ही नोंदणी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. यात इच्छुकांपैकी १६०० जणांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती, आयसीएमआरने दिली.
आतापर्यंत कोविशिल्ड या लसीचे परिणाम पहिल्यास एक आशा वाढली आहे. कोरोनावर ही लस परिणामकारक ठरेल. भारतामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या कोरोनाविषयी लसीची जी ट्रायल घेण्यात आली आहे, त्यात कोविशिल्डचे रिझल्ट चांगले असल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.
'कोविशिल्ड' लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी याआधी व्यक्त केला आहे. या लशीचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबपर्यंत आमच्या चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. पण, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लशीची येथील उपलब्धता अवलंबून आहे, असेही पूनावाला यांनी सांगितले आहे.
ऑक्सफर्डचा सीरमशी करार...
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने सीरम इन्स्टिट्यूटशी कोविशिल्ड लसीच्या उत्पादनासाठी करार केला आहे. त्यानुसार दोघांच्या समन्वयाने काम सुरू आहे. ही लस लवकरात लवकर सर्वसामान्यांच्या कामी येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - पिंपरीत सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेला केली सांगवी पोलिसांनी अटक
हेही वाचा - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत प्रहारचे बोंबाबोंब आंदोलन