इंदापूर( पुणे) - एके काळी माझ्या शब्दाला किंमत होती, आता राहिली की नाही माहिती नाही. तरीही डॉ. रत्नाकर महाजन यांना राज्यसभेमध्ये घेण्याची सूचना निश्चित करेन, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले. नियोजन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त इंदापूर येथे मुंबई वृत्तपत्र संघ व राधिका सेवा संस्था यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शिंदे बोलत होते.
इंदापूरकरांनी महाराष्ट्राला दिलेले सर्वोत्तम रत्न म्हणजे रत्नाकर महाजन-
डॉ. रत्नाकर महाजन यांनी काँग्रेसच्या शिबिरातून जे प्रबोधन केले ते आजमिती महत्त्वाचे आहे. रत्नाकर महाजन यांनी राज्याचे नियोजन मंडळाचे काम पाहिले आहे. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा' याचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नाकर महाजन आहेत. इंदापूरकरांनी महाराष्ट्राला दिलेले सर्वोत्तम रत्न म्हणजे रत्नाकर महाजन, त्यांची भाषणे व शिबिरातील वैचारिक भूमिका आजच्या घडीला खूप महत्त्वाची आहे. रत्नाकर महाजन यांना राज्यसभेमध्ये घ्यावे, अशी सूचना मांडतो. परंतु पूर्वी माझ्या शब्दाला किंमत होती, ती आता राहिलेली नाही, अशी खंत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. २०१९ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पराभव केला.