पुणे- लिव इन' मध्ये राहणाऱ्या पुरुषानं महिलेवर दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार केलेत. या प्राणघातक हल्ल्यात महिलेच्या मानेला आणि डोक्याला दुखापत झाली. सकाळी अकरा वाजता खडकी बिझनेस सेंटर मध्ये महिलेवर हल्ला झाला. महिला बाजारात खरेदीसाठी आली असताना प्रवीण हंडेने कोयत्यानं वार केला. हंडेला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले आहे.
सबंधित महिला आणि हंडे दोघंही विवाहित आहेत. माञ दोघंही आपल्या जोडीदारापासून विभक्त झालेत. दरम्यान सबंधित महिला पिंपरी चिंचवड मधील एका रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. त्याचवेळी प्रवीण हंडेशी तिची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर दोघांच्या प्रेमात झाले आणि आपल्या जोडीदारांना सोडून दोघे एकत्र राहू लागले. माञ मागील काही दिवसांपासून सबंधित महिला आणि तिच्या पतीत पुन्हा जवळीक वाढल्यानं दोघांत वितुष्ट निर्माण झाले आणि ती प्रवीणला भेटण्याचं टाळू लागली. आज ती आपल्या बहिणीसोबत खडकी बाजार येथे खरेदीसाठी आली होती. यावेळी प्रवीणने तिला गाठून बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती टाळू लागल्याने हंडेनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. तो पळून जात असताना तेथील नागरिकांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.