पुणे - मुंबई- बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात संगणक अभियंता पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी उघडकीस आली असून, राजीव दुबे आणि वर्षा राजीव दुबे असे अपघातात जखमी झालेल्या पती आणि पत्नीची नावे आहेत. चारचाकीवरील ताबा सुटल्याने मोटार 50 फूट खोल पुलावरून मुळा नदीत कोसळली. राजीव दुबे यांची प्रकृती गंभीर असून ते बेशुद्ध आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता राजीव आणि पत्नी वर्षा हे पुण्यातून वाकडच्या दिशेने येत होते. राजीव हे गाडी चालवत होते. तेव्हा त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुभाजक तोडून गाडी पुलावरून थेट नदीमध्ये कोसळली. या भीषण अपघातातून दोघे जण सुदैवाने बचावले असून राजीव याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या डोक्याला आणि छातीत मार लागला असून दोघांवर ही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.