पुणे - पुणे आणि अजनीदरम्यान नवीन साप्ताहिक सुपरफास्ट हमसफर एक्सप्रेस सेवेला शनिवार २३ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. नागपूर ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने ही हमसफर एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.
गाडी क्रमांक २२१३९ पुणे-अजनी सुपरफास्ट हमसफर रेल्वेची पहिली फेरी शनिवारी २३ फेब्रुवारीला रात्री दहा वाजता पुण्याहून सुरू झाली पुणे रेल्वे स्टेशनवर आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर तसेच रेल्वे कर्मचारी अधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते. ही नवीन रेल्वे प्रवाशांसाठी एक भेट असल्याचे खासदार अनिल शिरोळे यावेळी म्हणाले. रेल्वे प्रवाशांना या रेल्वेमुळे नक्कीच फायदा होईल, असेही ते म्हणाले. ही सुपरफास्ट हमसफर रेल्वे दर शनिवारी पुण्याहून रात्री दहा वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा वाजता अजनीला पोहोचेल. अजनीहून प्रत्येक रविवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी ही रेल्वे निघेल आणि सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पुणे रेल्वे स्टेशनला पोहचेल. ही गाडी रस्त्यात दौंड, मनमाड, चाळीसगांव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा या स्थानकांवर थांबे घेईल. या गाडीत १३ एसी थ्री टायर आणि २ एसएलआर कोच आहेत. पुणे ते अजनी प्रवासासाठी १३८५ रुपये भाडे असणार आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)