पुणे - मावळ हा गुलाब उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने परदेशात साडेसहा लाख गुलाब पाठवला जातो. परंतु, यावर्षी कोरोना संकटामुळे परदेशातील विमानसेवांवर निर्बंध लावण्यात आले होते. याचा थेट फटका गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून गुलाबाच्या मागणीमध्ये 30-40 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. दरवर्षी गुलाब उत्पादनातून कोट्यवधींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळायचे. यावर्षी कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळ, पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराश केवळ पडली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबासह इतर फुलांचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने परदेशात साडेसहा लाख गुलाब निर्यात करत 77 लाखांची उलाढाल केली होती. परंतु, यावर्षी कोरोना महामारी, निसर्गाची अवकृपा आणि अवेळी झालेला पाऊस यामुळे गुलाब उत्पादक मेटाकुटीला आला आहे.