पुणे - भीमाशंकर परिसरातील भीमा -भामा खोऱ्यात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये घरांवरील छत उडाले तर काही ठिकाणी झाडे जमीनदोस्त होत आहेत. निसर्गाचे वेगळेच रुप या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
भीमाशंकर परिसरात चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भामा-आसखेड व चासकमान धरणांमध्ये पाण्याच्या लाटा पाहायला मिळत आहेत. वादळी वाऱ्याचा जोर मोठ्या प्रमाणात असून अनेक घरांसह घरगुती वस्तूंचे व अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. या चक्रीवादळात महावितरणच्या विद्युतलाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. भीमा-भामा खोऱ्यात वारे वेगाने वाहत आहे. शेती, जनावरांचा गोठा, घरे, झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
शासकीय आपत्ती निवारण व्यवस्थापन यंत्रणाही नुकसानग्रस्त भागात मदतीसाठी सज्ज झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव वाढण्याची भीती असताना नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.