पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुड येथील उरवडे येथील एसव्हीएस कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवणे कठीण आहे. मृत नातेवाईकांचा डीएनए करूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवस लागणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
चौकशी समितीचा अहवाल अलीनंतरच गुन्हा दाखल-
झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आग कशामुळे लागली याचे कारण शोधण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. आज चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होऊन त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देखील यावेळी गृहमंत्र्यांनी दिली आहे.
फायर ऑडिटचे आदेश देण्यात येईल-
ही घटना शॉट सर्किटमुळे झालेली नाही. कंपनीतील प्रॉडक्ट्समधून ही आग लागली आहे. त्यामुळे इथं फायर ऑडिट बाबत लक्ष घातलं पाहिजे. पण ही खासगी वसाहत असल्याने याबाबत चौकशीचे आदेश देण्यात येईल, असेही यावेळी पाटील म्हणाले.
माझी मागणी पॉलिसीबाबत -
मी पॉलिसी बाबत मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी मध्यंतरीच याबाबत बोलले आहे. दोन ते तीन महिन्यात या पॉलिसी बाबत अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करता येईल. फायर ऑडिट बाबत नियम जास्त कडक कसे करता येईल, याचा विचार करणं ही काळाची गरज आहे. तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर पावले उचलणे गरजेचे आहे, असेही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.