पुणे - हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या आणि त्यांच्या स्मृती जपणाऱ्या श्रीक्षेत्र वढू येथील पवित्र मृदा (माती) पाठवण्यात येणार आहे. हिंदू जागरण मंचाच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूजनीय गोविंदगिरी महाराज यांच्याकडे ही मृदा असलेला चांदीचा कलश गुरुवारी सुपूर्द करण्यात आला.
मॉडेल कॉलनीतील स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पुढील आठवड्यात होत आहे. त्या सोहळ्याला गोविंदगिरी महाराज ही मृदा घेऊन जाणार आहेत.
स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले, "अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले जात असल्याने देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पावनभूमीतील ही मृदा हिंदू जागरण मंचाच्या वतीने प्रभू श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी अर्पण करताना मला आनंद वाटतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोक, विविध समुदाय आपापल्या परीने राम मंदिरासाठी दान देत आहेत. त्यात्या ठिकाणच्या पवित्र वस्तू देत आहेत, ही आनंददायी बाब आहे."
"हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या या राममंदिरासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावरील मृदा पाठविताना आम्हा हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांना अतीव आनंद होत आहे. प्रभू रामांची युद्धनीतीचा अवलंब करून संभाजी महाराज अनेक लढाया जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या बलिदानस्थळावरील मृदा राममंदिराच्या उभारणीत जाणे ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे," असे पुणे शहर प्रमुख निलेश भिसे म्हणाले.
हिंदू जागरण मंचाचे अध्यक्ष सुहास पवार, शहर सहप्रमुख राजेंद्र गावडे, सुहास साळवी, अक्षय उत्तेकर, महिला प्रमुख नलिनी गावडे, सुहास परळीकर, प्रसन्न दशरथ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.