पुणे : घरातील अडचणी दूर करण्यासाठी धार्मिक विधी करावे लागतील. तसेच शारीरिक दोष दूर करण्यासाठी जादूटोणा करावा लागेल, असे सांगून सॉफ्टवेअर इंजिनिअरची फसवणूक करण्यात आली आहे. यात पत्नीच्या मामेभावानेच एका ज्योतिषाशी संगनमत करून सॉफ्टवेअर इंजिनिअरचे 20 लाख रुपये तसेच 25 तोळे सोन्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा : या प्रकरणी धानोरी येथील एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अभिषेक कुलकर्णी ( वय 35 ), विजय गोविंद जाधव ( वय 30, रा. इंदापूर ), सदाशिव फोडे ( वय 37, रा. इंदापूर ) यांच्याविरुद्ध मानव बळी प्रतिबंधक तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 ते ऑगस्ट 2021 पर्यंत सुरू होता असे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले की, फिर्यादी हे पत्नी, दोन मुले आईसह धानोरी येथे राहतात. 10 मार्च 2021 रोजी माझ्या पत्नीचे मामा ( विजय जाधव ) हे त्यांच्या ओळखीच्या अभिषेक कुलकर्णीसह घरी आले. त्याची आमच्याशी ओळख करून दिली. आरोपी कुलकर्णीची ओळख करुन देताना विजय जाधव यांनी हस्तरेखा अभ्यासक असल्याचे आम्हाला सांगितले तसेच कुलकर्णी भविष्य देखील पाहतात असे त्यांनी आम्हाला सांगितले.
बँक खात्यावर पैसे पाठवले : त्यानंतर आरोपी कुलकर्णी यांनी घराची माहिती विचारली. तेव्हा 'मी' त्यांना घरातील समस्या सांगितल्या. त्यानंतर आरोपी कुलकर्णीने घरातील दोष दूर करण्यासाठी तसेच शारीरिक दोष दूर करण्यासाठी तुमच्या घरात मशीन लावावी लागेल, असे सांगितले. त्याचा खर्च १७ लाख ४६ हजार रुपयांचे असल्याचे सांगितले. त्यानंतर मी माझ्या पत्नीच्या मामाला विचारले असता, त्यांनी सांगितले की, मी माझ्या घरी मशीनही बसवले आहे. कुलकर्णी काकांना लगेच पैसे द्यावे लागतील. त्यानंतर आरोपी कुलकर्णीचा चालक सदाशिव फोडे याच्या बँक खात्यावर पैसे पाठवले. आरोपींनी ते उपकरण आणून घरात बसवले. त्यानंतर, त्यांना फरक पडल्यासारखे वाटले. घरातील इतर समस्या, घरातील शांतता राहण्यासाठी धार्मिक विधी करायचे आहेत, असे सांगून वेळोवेळी आमच्याकडून पैसे उकळ्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपींनी दागिण्यासह पैसे केले लंपास : त्यानंतर एके दिवशी आरोपी कुलकर्णी घरी आले. शारीरिक दोष दूर करण्यासाठी तुझी आणि तुझ्या भावाची पूजा करावी लागेल असे, ते म्हणाले. त्यांच्या घरी पूजा करण्यात आली. त्यात त्यांनी कणकेच्या मूर्ती तयार केल्या. त्या मूर्तींना घरगुती दागिने घालण्यास सांगितले. त्यानंतर या मूर्ती मठात नेऊन तेथे आठ दिवस पूजा होईल असे त्यांनी सांगितले.
25 तोळे दागिने पळवले : त्यानंतर आरोपीला घरातील मूर्तीसह सर्व 25 तोळे दागिने काढून देण्यात आले. मात्र, ते आठ दिवसानंतरही परत आले नाहीत. आरोपींना वारंवार विचारणा केली असता लॉकडाऊननंतर तुमचे दागिने परत करू, असे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही. फिर्यादीच्या पत्नीच्या भावाला विचारणा केली असता त्याने आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगत हात वर केले. अखेर फिर्यादीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - Tomato Truck Stolen : आता होतेय टोमॅटोची चोरी! बेंगळुरूमध्ये टोमॅटोने भरलेला पिकअप ट्रक चोरट्यांनी पळवला