पुणे - शहरात मित्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील उरुळगाव येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. दाजी बापू शिंदे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जालिंदर सुखदेव थोरात (32) आणि हिरामण चोरमले (29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील उरळगावच्या नदीत शीर नसलेला आणि शरीराचे तुकडे झालेला एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. शिरूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांसमोर खूप आव्हाने होती. कारण मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांमोर होते. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत मृत व्यक्तीची ओळख पटवली आणि मृताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जालिंदर सुखदेव थोरात याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
जालिंदर थोरात आणि मृत बापू शिंदे यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच रागातून जालिंदर थोरात याने बापू शिंदे यांचा खून करण्याचा कट रचला. खून झाला त्या दिवशी जालिंदर याने बापू शिंदे याला मासे आणण्यासाठी म्हणून उरळगाव येथे नेले. ठरल्याप्रमाणे दुसरा आरोपी हिरामण चोरमले कुर्हाड घेऊन आला. त्यानंतर दोघांनी संगनमत करून कुऱ्हाडीचे वार करून बापू शिंदे याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी हात, पाय, पोट कुऱ्हाडीने तोडून भीमा नदीपात्रात टाकून दिले होते. अशाप्रकारे कोणताही पुरावा मागे नसताना पुणे ग्रामीण पोलिसांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.