पुणे - भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत गुटखासाठा करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकास अटक झाली असून दोन जण फरार झाले आहेत. त्यांचा शोध भोसरी पोलीस घेत आहे. मोशी बोऱ्हाडेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली असून 16 लाख 75 हजारांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. कार्तिक सूभाष दळवी (वय २२, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोऱ्हाडेवाडी मोशी येथे मोठ्या प्रमाणात गुटखासाठा केल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पांचाळ यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, सदर ठिकाणी जाऊन शहानिशा करून छापा टाकला असता 16 लाख 75 हजार किंमतीचा अवैद्य गुटखासाठा मिळून आला.
एकाला अटक, दोघे जण फरार
याप्रकरणी गुटखासाठा करणारा आरोपी कार्तिक सूभाष दळवी याला अटक करण्यात आली असून गुटखा पुरविणारे साथीदार किरण कोठारी (रा. घरकुल चिखली) आणि गोपाल पाटील (रा. भोसरी, पुणे) हे दोघे फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-एक मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, गुन्हे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आदींनी केली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातील पलटुराम सरकार; रोज घोषणा करतात आणि मागे जातात - देवेंद्र फडणवीस