पुणे- कोविड १९च्या उपचारासाठी औषध नियंत्रकांनी भारतातील ठराविक औषध उत्पादक कंपनींना रेमडेसिवीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. या औषधांची उत्पादन क्षमता व मागणीमध्ये तफावत आहे. त्यामुळे, बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना वेळेत या औषधी मिळत नाही. त्यामुळे, कोविड रुग्णांना उपचार सुरू करण्याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल, कोविड-१९ प्रसिद्ध केला आहे. या प्रोटोकॉलनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन हे फक्त मॉडरेट कंडीशन (ऑक्सिजनवर) असलेल्या रुग्णांनाच देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी रेमडेसिवीर इंजेक्शन व टॉसिलिझुमॅब इंजेक्शनच्या वापराबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून, त्याची प्रत इंडियन मेडीकल असोसिएशन यांना देखील पुरवण्यात आली आहे. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रोटोकॉलनुसार पूर्णपणे तपासणी व आवश्यक चाचण्या करून रुग्णाची स्थिती बघूनच आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करणे गरजेचे असणार आहे. हे औषध कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्ण व त्याचे नातेवाईक औषध मिळवण्यासाठी धावपळ करतात, ही बाब योग्य नाही. तसेच, रुग्णालयातील वॉर्डबॉय/नर्सिंग स्टाफने रुग्णांच्या नातेवाईकांकडून औषध उपलब्ध करून देण्यासाठी जास्त पैशांची मागणी करणे अत्यंत गंभीर आहे.
हॉस्पिटल व्यवस्थापनाने-
१. क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल- कोविड- १९ व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
२. हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या (ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे) विचारात घेऊन गरजेनुसार मर्यादित साठा खरेदी करावा. जास्तीचा साठा खरेदी करून ठेऊ नये.
३. हॉस्पिटल कोविड वॉर्डमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वापराबाबत रजिस्टर तयार करावे. त्यामध्ये पेशंटचे नाव व पत्ता, औषधीचे नाव, समूह क्रमांक, वापरलेली संख्या व आकारलेली किंमत याबाबींचा समावेश करावा.
४. काही कारणाने रेमडेसिवीर औषधीचा पूर्ण डोस देण्यात आला नाही, तर तिचा उर्वरित साठा हॉस्पिटल फार्मसी किंवा रुग्णांच्या नातेवाईकास परत करावा व त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवावे.
५. कोविड वॉर्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवावे व हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास हॉस्पिटल व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. कोविड १९च्या रुग्णांना तात्काळ उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यपद्धतीचे अवलंबन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा- मद्यपान करण्यासाठी अल्पवयीन मुलासह 'तो' करायचा घरफोडी आणि दुचाकीची चोरी