पुणे : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहे. तर दुसरीकडे गाव करोनामुक्त ठेवण्यासाठी 'करोनामुक्त गाव योजना' राबवण्यात येत आहे. १० जानेवारी ते १५ मार्च हा या योजनेचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
कोरोना रोखण्यासाठी पाच पथके
गावांना कोरोनामुक्त ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून कोरोनामुक्त गाव योजनेत कोरोनाला रोखण्यासाठी पाच पथके तयार करण्यात येणार आहेत.पहिले पथक कुटुंब सर्वेक्षणपथक आहे. या पथकात ग्रामपंचायतीचे सदस्य, आरोग्यसेविका, आशा वर्कर, जिल्हा परिषदेचे शिक्षक, संस्थांचे प्रतिनिधी आदींचा समावेश असेल. हे पथक प्रत्येक घरी जाऊन लक्षणे आहेत का याची माहिती घेणार आहे. तसेच घरातील व्याधी असलेली व्यक्ती, लहान मुले आणि गरोदर मातांनी या कालावधीत कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहितीही देईल.
पाच बाबींवर करावे लागणार काम
या स्पर्धेत जिंकण्यासाठी आणि बक्षिसाची मोठी रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी गावांना पाच प्रकारच्या बाबींवर काम करावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंब सर्वेक्षण पथक स्थापन करणे आणि त्याच्या माध्यमातून कुटुंबनिहाय सर्वेक्षण करणे, गावात विलगीकरण कक्ष स्थापन करणे, कोरोना तपासणीसाठी आणि रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी वाहनचालकांचे पथक निर्माण करणे, हेल्पलाइन आणि कोरोना लसीकरण पथक स्थापन करावे लागणार आहे.
सहभागासाठीच्या अटी...
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी १० जानेवारी ते १५ मार्च २०२२ असा कालावधी
स्पर्धा कालावधीत केलेल्या कामांचेच मूल्यांकन केले जाणार
स्पर्धेत भाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींना १५ मार्चपर्यंत स्वमूल्यांकन करावे लागेल
स्वमूल्यांकनाचे प्रस्ताव १५ मार्चअखेर गट विकास अधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य
ग्रामपंचायतींच्या स्वमूल्यांकनाची २० मार्चपर्यंत गट विकास अधिकारी तपासणी करणार
तपासणीतील गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे पहिल्या गावांची यादी होणार
जिल्ह्यातील गावांची झेडपीचे सीईओ तपासणी करून गुणानुक्रमे पहिली तीन गावे निवडणार
सीईओ जिल्ह्यातील गुणानुक्रमे पहिल्या तीन गावांची नावे विभागीय आयुक्तांना पाठविणार