पुणे - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना,आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यात बैठक झाली. त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दिल्याचे पत्रक जाहीर केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परंतु, स्थानिक रहिवाशी नसल्याच्या कारणावरून त्यांना विरोध होत होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मयुरेश अरगडे चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या मतात विभागणी होण्याची शक्यता होती.
हेही वाचा - पिंपरी, चिंचवड अन् भोसरी मतदारसंघात बंडखोरी!
यावेळी ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे उपस्थित होते.
हेही वाचा - दिलीप मोहितेंना तुरुंगवास निश्चित, सुरेश गोरेंचा निशाणा
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना, ब्राम्हण महासंघाचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही, तर त्यांच्या काही मागण्या आहेत, ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रोष सरकारवर आहे. पण सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नाही. आचारसंहिता समाप्त होताच आम्ही त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करू. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा उमेदवार माघार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.