पुणे - मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सारथीबाबत त्यांचा दृष्टिकोन भेदभावाचा आहे. ते वेळोवेळी सारथीबाबत खोटी आणि दिशाभूल करणारे वक्तव्य करत आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. महाविकास आघाडी सरकारने विजय वडेट्टीवार यांना हटवावे आणि त्यांच्या जागी सारथीला न्याय देणाऱ्या लोकप्रतिनिधींची नेमणूक करावी, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार मदत पुनर्वसन व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आहेत.
सारथीची स्वायत्तता कायम ठेवू आणि त्यास जास्तीत जास्त निधी देऊ, असे मंत्री विजय वडेट्टीवार गेली 6 महिने विविध बैठकीत सांगत आहे. मात्र, प्रत्यक्ष सारथीच्या कार्यभारात सरकारमार्फत सारथीची स्वायत्तता न राहता मंत्रीकेंद्रीत शासन निर्णय काढत आहे. 11 आयएएस असलेल्या नव्या संचालक मंडळाला नामधारी ठेवले आहे. चालू योजना बंद करुन विद्यार्थ्यांना विद्यावेतनासाठी रखडवले आहे. शासन पातळीवर एकही नवीन योजना सुरू केली नाही आणि संस्थेकडून शासन मान्यतेसाठी पाठविलेले प्रस्ताव देखील प्रलंबित आहेत, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी केली.
हेही वाचा - मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
मराठा समाजाच्या जबाबदार प्रतिनिधी म्हणून आम्ही याठिकाणी आमचे मत व्यक्त केले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेणारे लोक हे भाजपचे आहे, असा आरोप केला होता. हा आरोपा चुकीचा आहे. आम्ही याचा निषेध करतो, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार काकडे यांनी सांगितले.
आज (मंगळवारी) मराठा आरक्षणावर सुनावणी होत आहे. त्यात सरकारने पूर्ण ताकदीने लढावे. त्यात काही दगा फटका झाला तर या सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रघुनाथ चित्रे यांनी दिला. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राजेंद्र कुंजीर, रघुनाथ चित्रे, सचिन आडेकर, राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, मीना जाधव, श्रुतिका पाडळे आदी उपस्थित होते.