पुणे - पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे गुंडांशी झटापटीत जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या हाताला मुक्का मार लागला आहे. योगेश जगताप खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेला पकडताना ते जखमी झाले आहेत. आरोपींनी पोलीस अधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र, धाडस दाखवत पोलीस आयुक्तांनी आरोपींना पकडले.
हेही वाचा - Peacocks Born Form Landor: लांडोरच्या अंड्यांतून प्रथमच मोरांचा जन्म
सविस्तर माहिती अशी की, 18 डिसेंबर रोजी योगेश जगतापचा भर चौकात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने हे फरार होते. त्यांचा शोध गुंडा स्कॉड, सांगवीचे डिबी पथक आणि गुन्हे शाखा युनिट चार हे घेत होते. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, तिन्ही आरोपी हे चाकण परिसरातील कोये येथील डोंगराळ भागात आहेत. त्यानुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे स्वतः आणि संबंधित अधिकारी दाखल झाले.
शेतातील एका घरात आरोपी हे दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना होती. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार टीम करण्यात आल्या. त्यात, गुंडा स्कॉडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सतीश कांबळे तसेच, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर हे उपस्थित होते. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला.
दरम्यान, आरोपींनी पोलिसांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. हे पाहून प्रत्युत्तर देत सुनील टोनपे आणि सतीश कांबळे यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे, जंगलातून आरोपी सैरभैर धावत सुटले. तेव्हा, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे त्यांच्या पुढे उभे राहिले. त्यांनी त्यांच्या अंगावर लाकडाचा ओंडका टाकला आणि त्यांना खाली पाडले. त्यांच्यात झटापट झाली. तात्काळ तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.
हेही वाचा - New Traffic Rules : 'हे' 50 वाहतूक नियम मोडल्यास कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार