पुणे- पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्री डोंगराच्या कुशीला जमिनीवरील स्वर्ग म्हटले जाते. या ठिकाणी विशिष्ट हंगामात रानभाज्यांचा स्वाद अगदी तृप्त करणारा असतो. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे या रानभाज्यांची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने भिमाशंकर परिसर व जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
माड, कारटुले, चावावेल, पेरा, शेऊन लेथी, यासारख्या चाळीसहून अधिक जातीच्या रानभाज्या या आदिवासी भागात सापडतात. या साऱ्या भाज्या १०० टक्के नैसर्गिक औषधी व पोषणमुल्यांनी उपयुक्त असतात. आदिवासी बांधवांना परंपरेने या नैसर्गिक रानभाज्यांची माहिती असतेच शिवाय अगदी चवदार पद्धतीने या भाज्या बनवून ते खायलाही देतात.
रानभाज्यांमधील काही भाज्या हंगामातून एक दोन वेळा खाल्या की वर्षभर पोटाचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते. रामकेळी ही खोकल्याच्या विकारावर उपयुक्त असते. ती सह्याद्री डोंगर रांगातील भागात मोठ्या संख्येने उगवते. मात्र या भाज्यांना योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने त्या दुर्लक्षित होत चालल्याची खंत आदिवासी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; जन्मदिनीच डॉक्टरसह चालकाचा मृत्यू
या महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी तोंडाल पाणी सुटेल अशा रान भाज्या तयार केल्या होत्या. या भाजीचा पर्यटकांनी भरपूर आस्वाद घेतला. या महोत्सवाला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी समाजाकडे असणारे निसर्गाचे देणे शहरी लोकांपर्यत पोहाचावे. तसेच त्यांना निसर्गातून मिळणाऱ्या वस्तुंमधून काही प्रमाणात तरी अर्थप्राप्ती व्हावी हा या महोत्सवाच्या आयोजनामागचा हेतू होता.