पुणे - शिवनेरी किल्ल्याच्या कड्यावरून एक ट्रेकर तरुणी खाली पडल्याची घटना घडली आहे. मात्र, यामध्ये तिचा जीव वाचला असून हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर चढाई करताना याच ठिकाणावरून खाली पडून एकाला जीव गमवावा लागला होता.
सध्या तरुणाई गड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना दिसतेय. मात्र, धोकादायक ठिकाणावरून ट्रेक करत असताना अनेकजण खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळी देखील ट्रेकिंग करत असताना एका तरुणीचा जीव थोडक्यात बचावला आहे. हा थरार जुन्नर येथील पक्षीमित्र धीरज चौरे यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धीरज आज शिवनेरीच्या पायथ्याला काही पक्षांचे फोटो काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी किल्ल्यावर काही पर्यटकांचा ग्रुप अवघड वाटेने ट्रेक करत किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या बाजूने साखळदंडाकडे जात होता. त्यादरम्यान काही पर्यटक मागे पुढे चालत असताना एक तरुणीने साखळदंडाकडे शॉर्टकट घेण्याच्या उद्देशाने कड्यावरून जायला सुरुवात केली. यावेळी या महिलेचा तोल गेला आणि घसरत खाली येवू लागली. मात्र, यामध्ये 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीप्रमाणे ती बचावली. हा सर्व थरार धीरज यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.