पुणे : कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता समाजासाठी लढत आहेत. कोरोना योद्धांच्या पाठीशी गणेश मंडळे आणि समाज आहे. त्यांची मौल्यवान कामगिरी लक्षात घेऊन श्रींची प्राणप्रतिष्ठापना कोरोना योद्धांच्या हस्ते करण्याचा निर्णय पुणे शहर गणेश उत्सव समितीने घेतला आहे. समितीचे निमंत्रक संजय बालगुडे यांनी ही माहिती दिली.
पुणे शहर गणेश उत्सव समितीमध्ये शहरातील ८०-९० मंडळे आहेत. त्यापैकी ५०-६० मंडळानी कोरोना योद्धांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे. पुण्यात कोरोनाच्या सुरुवातीला भवानी पेठ हॉटस्पॉट ठरलं होतं. त्यावेळी जिथं जायला आणि काम करायला लोक घाबरत होती. अशा ठिकाणी या कोरोना योद्धयांनी पुढे येत काम केले आहे. यात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी अशा विविध लोकांना बोलावून आम्ही श्रींची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत, अशी माहिती बालगुडे यांनी दिली.
आमच्या समाजाचा गणपती लोकमान्य टिळकांनी सुरू केला असून यंदा आमच्या मंडळाला 127 वर्ष पूर्ण झाली आहे. आमच्या इथे कोरोना काळात एका डॉक्टरांनी गेली साडे चार महिने अहोरात्र परिश्रम करून सेवा केली आहे. त्यामुळे यंदा आम्ही त्या डॉक्टरांकडूनच श्रींची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत, अशी माहिती पुणे बडाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बडाई यांनी दिली.