पुणे : दरवर्षी गणेश मंडळात वेगवेगळे देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. परंतु त्यातील एखादाच देखावा हा चर्चेत असतो. यावर्षी मात्र नवीन देखावा म्हणून सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या देखाव्याची मागणी जास्त होत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात सामान्य माणूस संभ्रमावस्थेत आहे. त्याला पडलेल्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या देखाव्याची मागणी जास्त होत असल्याची माहिती समोर येत आहे. कलाकारांकडूनसुद्धा तसे देखावे तयार करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे.
पुण्यामध्ये देखाव्यावरून मोठा वाद : यावर्षी देखील मागणीप्रमाणे देखावे तयार केले जात आहेत. गेल्या वर्षी पुण्यामध्ये एका राजकीय देखाव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर तो देखावा रद्द करण्यात आला होता. यावर्षी आता मुख्य आकर्षण म्हणजे 'कोणता झेंडा घेऊ हाती' हा देखावा आहे. त्याला सध्या प्रचंड मागणी मंडळांकडून आहे. त्यासाठी कलाकार सुद्धा काम करत आहेत.
वेगवेगळ्या देखाव्याची मागणी : याविषयी बोलताना सतीश तारू हे कलाकार म्हणाले की, यावर्षी वेगवेगळ्या देखाव्यांची मागणी आमच्याकडे आलेली आहे. 70 ते 80 टक्के देखाव्यांचे बुकिंग झालेले आहे. त्यांचं काम सुद्धा जवळपास आता संपत आलेलं आहे. सामाजिक, पर्यावरण, राजकीय, धार्मिक पारंपारिक सगळ्या देखाव्यांची मागणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आलेली आहे. परंतु, यावर्षी नवीन थिम आम्ही घेऊन येत आहोत. तो म्हणजे 'कोणता झेंडा घेऊ हाती' हा देखावा आहे. या देखाव्यात विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे. त्याच्यासमोर सामान्य नागरिक हे देवालाच आता विचारत आहेत की, कोणता झेंडा घेऊ हाती? महाराष्ट्रात असलेल्या राजकीय अस्थिरतेवर हा देखावा सादर केला जात आहे.
यावर्षी 'या' देखाव्यांना मागणी जास्त : यावर्षी महागाईचा फटका सुद्धा हे देखावे तयार करणाऱ्या कलाकारांना मिळालेला आहे. उत्सवानंतर या देखाव्याचा काही उपयोगच होत नसतो. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत व्यवसाय करणं, आता गरजेचं झालंय, अशी प्रतिक्रिया या व्यवसायिकांनी दिलेली आहे. त्याचबरोबर मंडळ ज्याप्रमाणे देखावे मागते, त्याप्रमाणे तयार करण्याची आमची कृती असते. या वर्षी 'कोणता झेंडा घेऊ हाती', 'शासन आपल्या दारी' हे देखावे आता सादर होणार आहेत.
हेही वाचा :