पुणे - जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर गणपतीच्या द्वारयात्रेची आज रविवारी समाप्ती झाली. सोमवारी २ तारखेपासून देशभरात श्री गणेशाचं आगमन होणार असल्याने या सोहळ्याची तयारी त्याआधीच ओझरमध्ये सुरु आहे.
ओझरच्या विघ्नहराची 'द्वारयात्रा' संपन्न विघ्नहर गणपतीच्या मानलेल्या ४ बहिणींना या सोहळ्याला निमंत्रित करण्याची परंपरा आहे. उंब्रजच्या महालक्ष्मीला निमंत्रण देण्यासाठी येडगाव धरणाच्या पाणीसाठ्यातून होडीने प्रवास करावा लागतो. मग विधिवत पूजा करुन महालक्ष्मीला उंब्रजकर ग्रामस्थ पाठवणी करतात. या नेत्रदीपक सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित असतात. पेशवेकाळाच्या अगोदर पासून ही परंपरा सुरु आहे. ओझर आणि उंब्रज या गावांना जोडणारा जुना रस्ता येडगाव धरणात बुडाल्यामुळे मागील काही वर्षांपासून गणेशभक्तांना हा प्रवास होडीने करावा लागत आहे. या दोन्हीं गावच्या ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून पुलाची मागणी पूर्ण न झाल्याने हा धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची माहिती आहे.या सोहळ्याला अनेक भाविक दर्शनासाठी अनवानी चालत येतात. त्यामुळे या उत्सवाला वेगळेच महत्त्व आहे. सोमवारी याठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.