पुणे - महाराष्ट्रात पुण्यातल्या येरवडा कारागृहामध्ये 'तुरुंग पर्यटन' हा देशातला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम 26 जानेवारीपासून सुरू झाला आहे. 'तुरुंग पर्यटन' ऐकताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला असू शकतो. या माध्यमातून नक्की काय दाखवले जाणार, असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडू शकतो. मात्र, पुण्यातला हा येरवडा तुरुंग दीडशे वर्ष जुना असून या तुरुंगात घडलेल्या अनेक घटना या भारतीय स्वतंत्र लढातल्या महत्त्वाच्या अग्रणी स्वातंत्र्यसेनानींशीही संबंधित आहेत. येथील वास्तू पाहणे हाही अनेकांसाठी अनोखा अनुभव ठरू शकतो.
हेही वाचा - येरवडा तुरुंगामधून देशातील पहिल्या 'जेल टुरिझम' उपक्रमाला सुरुवात
या तुरुंगाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणार्यांनी या ठिकाणी बंदी म्हणून वास्तव्य केले. ही जागा पाहणे त्यांच्या त्यागाची अनुभूती घेणे तसेच, दीडशे वर्षे महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग म्हणजे नक्की काय, याची माहिती घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. त्यातूनच या अनोख्या तुरुंग पर्यटन संकल्पनेला मूर्त स्वरूप आले. या येरवडा तुरुंग पर्यटन माध्यमातून दररोज 50 जणांना तुरुंगात पर्यटन करता येणार आहे.
काय पाहता येणार?
या पर्यटनात पर्यटकांना काय काय बघता येईल, याचा विचार केला तर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, सरोजिनी नायडू या महान स्वातंत्र्य सेनानींना ज्या खोल्यांमध्ये येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते, त्या भागाला सध्या 'गांधी यार्ड' हे नाव देण्यात आले आहे. हे गांधी यार्ड पर्यटकांना पाहता येणार आहे. तसेच, गांधी यार्डमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला होता. त्या ऐतिहासिक जागेलादेखील पर्यटकांना भेट देता येणार आहे. तसेच, लोकमान्य टिळकांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तो परिसर आता 'टिळक यार्ड' म्हणून ओळखला जातो. या टिळक यार्डला देखील पर्यटकांना भेट देता येणार आहे. तसेच, गुन्हेगारांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात येते, तो 'फाशी यार्ड'देखील पाहता येणार आहे.
हेही वाचा - जळगावची समृद्धी संत बनली 'ऑल इंडिया परेड कमांडर', प्रजासत्ताक दिनी केले देशाचे नेतृत्व